Monday 17 October 2011

मांगल्याची ओढ!

 

 

मांगल्याची नित्य असू दे, जीवास रे ओढ,

जीवा शिवाचे मिलन होता, जीवन होते गोड !

 

 

मांगल्य हे काय असे रे, सांग जरा रे गुज ?

 

 

 

स्वरुपात तु अमृत आहे, नी व्यापक विश्र्वरुपात;

जाणून हे तू वर्तून पुन्हा नांदावे स्वरूपात!

जीव, जगत्, जगदीश्र्वराच्या ऐक्याचे प्राबल्य;

ध्यानी ठेवून कर तू कार्य हेच असे मांगल्य!

 

 

 

 

म्हणूनच म्हणतो, मांगल्याची नित्य असू दे, जीवास रे ओढ,

जीवा शिवाचे मिलन होता, जीवन होते गोड !

 

 

 

 

शिवास स्मरूनी जीव जे करतो, दैनंदिन व्यापार,

शिवास विसरूनी, हरवून बसतो, घडतो रे व्यभिचार!

 

 

ध्येयभ्रष्ट होणे रे म्हणजे करणे रे व्यभिचार,

ध्येयप्रेरणेने रे जगणे, म्हणजे शिष्टाचार!

 

 

 

म्हणूनच म्हणतो, मांगल्याची नित्य असू दे, जीवास रे ओढ,

जीवा शिवाचे मिलन होता, जीवन होते गोड !

भगवंत गीता गातो !

 

 

 

“नको घाबरू !

नको बावरू !

नको फिरू तु मागे !

ऊठ ऊभा हो लढण्यासाठी,

मी सारथी तुझा रे !”

असे सांगतो भगवान, अर्जुनाला !

माझ्या-तुमच्यासाठी !

निश्चयाने त्या द्वंद्वांनाही जिंकूनी घेण्यासाठी !

असूरवृत्तीशी जे युध्द, नितदिन आपण करतो;

अपुल्यासाठी प्रोत्साहनपरं भगवंत गीता गातो !

 

 

 

जेव्हा पसरे भयाण रात;

मार्ग दिसेना ना वहिवाट;

अशाच वेळी हो मजबूत !

बुध्दीलाही राख शाबूत !

प्रलोभनास नको बळी पडू !

भितीने तु नको मरू !

तुझ्या तपाने;

ईश बळाने;

सार्थक कर तु कार्य महान;

अमृतपूर्ण तु नसे लहान !

जीवन सजवून घे हे छान !

असे सांगतो रे भगवान;

तुला नी मजला हे वरदान !

 

 

 

कार्य करून जेंव्हा थकतो ; ध्येय ही जेंव्हा विसरतो !

तेव्हा अपुल्यासाठी प्रोत्साहन पर भगवंत गीता गातो !

ईश्वरार्पण!

 

 

 

उल्हासाने नटलेले, क्रीडेने ते भरलेले,

खेळायाच्या रीतीमध्ये भाव-रहस्य ही दडलेले;

प्रेय ही आहे, श्रेय ही आहे,

जगण्याने हे सजलेले !

 

 

 

 

 

 

भावाने अन् बुध्दीने;

परंपरेतून खूललेले,

सूख ही माझे, दु:ख ही माझे,

जगण्याने हे सजलेले!

 

 

 

 

 

सातत्याच्या नवलाईने,

प्रेमाने अन् प्रसन्नतेने;

मनोमंथन नी मनोरंजनही,

जगण्यानेच सजलेले !

 

 

 

 

 

उत्कटता अन् उत्कंठेने,

तुलाच म्हणूनी तुलाच रे,

ईश्वरा! अर्पण करितो श्वासही माझे,

जगण्याने ते सजलेले !